आमदार रवी राणासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक

अमरावती :  अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करा, टाळेबंदीच्या काळातील वीज बिल माफ करा इत्यादी मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनला हिंसक वळण लागले. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल २ तास अडवून धरला होता.

अमरावती :  अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करा, टाळेबंदीच्या काळातील वीज बिल माफ करा इत्यादी मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनला हिंसक वळण लागले. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल २ तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढले. आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर टायर जाळले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याने आम्ही दिवाळी तुरुंगात साजरी करु, असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला आहे. रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केल्याचे सांगितले मात्र तरीही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही. त्यामुळे रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आला.