तहसीलदारांना शिवीगाळ केली; आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा अन् १५ हजारांचा दंड

तहसीलदार राम लंके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 353, 186, 294, 506 अंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना 3 महिने सक्त मजूरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

    अमरावती (Amravati) : अमरावती जिल्ह्यातील (Amravati) वरुड मोर्शी मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 2013 साली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन माईक अंगावर फेकला होता. या प्रकरणी तब्बल 7 वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल देत आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    काय आहे संपूर्ण प्रकरण?
    15 मे 2013 रोजी पंचायत समिती सदस्य असतांना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात गेले होते. यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते तुम्ही माझा फोन कट का केला? असा दम देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना भरला होता. इतकेच नाही तर तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    गुन्हा सिद्ध झाल्याने शिक्षा
    या प्रकरणी तहसीलदार राम लंके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 353, 186, 294, 506 अंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता. यात दोषापत्र दाखल करण्यात आल्याने आणि यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना 3 महिने सक्त मजूरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इतकेच नाही तर दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्याचं म्हटलं आहे.