कुटीर रुग्णालयातील रुग्णांशी संवाद; केंद्रीय आरोग्य पथकाची देवमाळीला भेट

कोरोना संक्रमणाच्या पाश्वर्भूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने शुक्रवारी दुपारी 12 वा. परतवाडा शहराला भेट दिली. कुटीर रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व ग्रामपंचायत देवमाळी येथे बालाजी नगर येथे कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत आढावा घेतला.

    परतवाडा (Paratwada).  कोरोना संक्रमणाच्या पाश्वर्भूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने शुक्रवारी दुपारी 12 वा. परतवाडा शहराला भेट दिली. कुटीर रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व ग्रामपंचायत देवमाळी येथे बालाजी नगर येथे कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत आढावा घेतला.

    दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे श्वसनरोग तज्ञ डॉ. अमितेश गुप्ता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संदीप राय यांचा या पथकात समावेश होता.
    केंद्रीय आरोग्य पथकाने डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील औषधीसाठ्याबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधला. एकंदरीत विलगीकरण, लसीकरण, कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बुरडघाट येथील उपचार बंद करण्याचे सांगत कोविड रुग्णालयातच सुविधा देण्याचे निर्देश दिले.

    या पथकाने देवमाळी येथील बालाजीनगर येथील कंटेन्मेंट झोनला भेट देत आशावर्कर, कोविड सेवेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. उपचाराचे नियोजन करण्याबाबतची माहिती जाणून घेतली. नंतर पथक अमरावतीसाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले, डॉ. जाकीर उपस्थित होते.

    रातोरात उभारला झालरवाला मंडप
    परतवाडा शहरातील कुटीर रुग्णालय परिसरात डेडिकेटेड कोविड रुग्णालय उभारण्यात आल्यानंतर याच ठिकाणी कोरोना चाचणीच्या अनुषंगाने रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी केली जाते. या चाचण्यांकरण्याकरिता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. उन्हाच्या दिवसात अनेक नागरिकांना रांगेत उभे राहून चाचणी करून घ्यावी लागत होती. सावलीची व पाण्याची सुविधा नसताना नागरिक तासंतास उन्हात रांगेत असत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचणी केल्या जाणाऱ्या ठिकाणी रातोरात केंद्रीय पथक येत असल्याने सुंदर असा मंडप उभारला. नागरिकांना काय त्रास होतो, याची साधी दखल आरोग्य विभागाने घेतली नाही.

    किट नसल्याची तक्रार करताच झाली चाचणी
    कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र पाटील हे कुटीर रुग्णालयात चाचणी करण्याकरिता आले असता अँटिजेन रॅपिड टेस्टची किट नसल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान केंद्रीय पथक दाखल झाले. रवी पाटील तक्रार करतील म्हणून तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे यांनी त्यांना अलिकडे उभे रहा, असे म्हणताच रवी पाटील जाम भडकले. त्यानंतर त्यांना किट उपलब्ध करीत चाचणी करून दिली. रवी पाटील यांनी केंद्रीय पथकासमक्ष ही समस्या कथन केली.