कोंडवाड्याची जागा विकली खासगी व्यक्तीला; हनवतखेडा ग्रामपंचायतचा प्रकार

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हनवतखेडा येथे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने सर्व शासकीय नियम वेशीला टांगत ग्रामपंचायतीच्या मालकीचा कोंडवाडा खासगी व्यक्तीला विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

    अमरावती (Amravati).  अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हनवतखेडा येथे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने सर्व शासकीय नियम वेशीला टांगत ग्रामपंचायतीच्या मालकीचा कोंडवाडा खासगी व्यक्तीला विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिली असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

    एकीकडे गरिबांना घरकुल बांधकाम करण्यात भूखंड उपलब्ध नसतांना ग्रामपंचायतीची जागा आर्थिक संपन्न असणाऱ्या लोकांना परस्पर विकण्याचा प्रकार समोर आला आहे.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच व सचिव यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीच्या मालकीची शासकीय मालमत्ता (कोंडवाडा) खासगी वापराकरिता हस्तांतरित केली आहे.सदर जागेवरील कोंडवाडा इमारत ग्रामपंचायत स्थापनेपासून ताब्यात होती मात्र कोंडवाडा पाडून त्या ठिकाणी खासगी व्यक्तीने इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे.

    हा प्रकार पाहून गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती,अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी चौकशी करण्याकरिता विस्तार अधिकारी यांची निवड केली आहे.

    तूर्तास बांधकाम थांबविण्यात आले आहे. सदर जागा ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर जागा काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला दान देण्यात आली होती, त्यामुळे या जागेवर ग्रामपंचायतीचा हक्क आहे. मात्र ही जागा ग्रामपंचायतीने गावातील इसमास परस्पर विक्री केली असून त्याची खरेदी झाल्याचे समजते. यासर्व प्रकाराची चौकशी करण्याकरिता अधिकाऱ्यांचे पथक दाखल होणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी कासदेकर यांनी दिली आहे.