जमावबंदी, दुकानं सात वाजता बंद होणार; अखेर लॉकडाऊन जाहीर?

विदर्भात कोरोनाचा धोका खूपच वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. यवतमाळ, अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    वर्धा : विदर्भात कोरोनाचा धोका खूपच वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. यवतमाळ, अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लग्न व इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींना परवनगी देण्यात आली आहे. औषधी दुकाने आणि रुग्णालये सोडून इतर दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहेत. तर, यवतमाळमध्येही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

    अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

    या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल आणि मनपा प्रशासनाव्दारे विशेष पथके गठीत करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.