
अमरावती. मागील तीन ते चार महीन्यात आयुक्तालयातील बडनेरा, वलगाव तसेच ग्रामिण भागातील दर्यापूर व चांदूर रेल्वे या चार ठाण्यांच्या हद्दीत चाकूच्या धाकावर लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. हे गुन्हे करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना माना पोलिसांनी गुरूवारी (दि. १७) रात्री अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्य अमरावती शहरातील रहीवासी असून त्यांच्याच शोधात माना पोलिस शुक्रवारी (दि. १८) शहरात आले आहेत.
माना पोलिसांनी अब्दुल रहेमान रफी (३०, रा. चेन्नई, ह. मु. बडनेरा) आणि प्रतिक मनोहरे (रा. बिच्छुटेकडी, अमरावती) या दोघांना अटक केली असून त्यांचे काही साथीदार पसार आहे.
माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ डिसेंबरला अकोला राष्ट्रीय महामार्गावर कुरूम ते माना या दरम्यान एका मालवाहूू वाहन चालकाला चाकूच्या धाकावर लूटले होते. यावेळी लूटारुंनी त्या वाहन चालकाकडून ३५ हजार रुपयांची रोख तसेच दोन मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणात माना पोलिसांनी अज्ञाताविरुध्द वाटमारीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या गुन्ह्याचे आरोपी बडनेरा परिसरातील असल्याची माहीती मानाचे ठाणेदार संजय खंडारे यांना मिळाली होती. त्यामुळे माना पोलिसांंचे पथक बडनेरात पोहचले मात्र आरोपी बडनेरात नव्हते.
त्याचवेळी वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथे आरोपी लपून बसल्याची माहीती मिळाल्याने माना पोलिसांनी अ. रहेमान रफी आणि प्रतिक मनोहरे या दोघांना नाचनगावातून ताब्यात घेवून अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माना हद्दीतील गुन्ह्याच्या कबुलीसोबतच अमरावती ग्रामिणमधील दर्यापूर व चांदूर रेल्वे तसेच अमरावती आयुक्तालयातील वलगाव आणि बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा चार वाटमारीच्या गुन्ह्यांंची कबुली दिली आहे. अमरावती शहर व ग्रामिण पोलिसांचे पथक मागील दोन ते तीन महीन्यांपासून वाटमारीतील आरोपींच्या शोधात होते मात्र त्यांना आरोपींना पकडण्यात यश आले नव्हते. दरम्यान माना पोलिसांनी अटक केलेल्या या दोन्ही आरोपींना २२ डिसेेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अशी माहीती मानाचे ठाणेदार संजय खडसे यांनी दिली.