yashomati thakur arrested

वनवेतून वाहन नेण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे

अमरावती. वनवेतून वाहन नेण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे( Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur sentenced to three months). या प्रकरणात चालक व दोन कार्यकर्त्यांना देखील शिक्षा झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

तीन महिने सश्रम कारावास व प्रत्येकी १५ हजार ५०० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास १ महिने अतिरिक्त कारावास असे शिक्षेचे स्वरूप आहे. २४ मार्च २०१२ रोजी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडलेल्या प्रकरणात ही शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

शिक्षा झालेल्यांमध्ये पालकमंत्र्यांसह सागर सुरेश खांडेकर, शरद काशीराव जवंजाळ व राजू किसन इंगळे यांचा समावेश आहे. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

अशी घडली होती घटना

या घटनेची तक्रार शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली होती. दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी २४ मार्च २०१२ रोजी दुपारी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व विद्यमान कॅबीनेट मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुना भट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्या वेळी तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी एकेरी मार्ग असल्यामुळे त्यांचे वाहन अडविले. त्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या घटनेच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता.

मी पूर्णपणे निर्दोष आहे

न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मानच आहे. मी निर्दोष असून, हायकोर्टात अपील केली आहे. आठ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. त्यावेळी जी तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. त्यात ते राजकीय दबावत हे प्रकरण घडले. पंरतू मी पूर्णपणे निर्दोष आहे. हायकोर्टात न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

ॲड. यशोमती ठाकुर, पालकमंत्री.