‘माझी हार्ड डिक्स फुटत आहे’… दीपाली चव्हाण आत्महत्येपूर्वी पतीला लिहिलेले भावनिक पत्र व्हायरल

मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वश्री जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे.

    अमरावती: महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी आपल्या पतीला भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यांनी आपल्या पती राजेश मोहिते यांना लिहलेल्या पत्रात DFO शिवकुमार यांचा वारंवार उल्लेख तर श्रीनिवासन रेड्डीचा देखील उल्लेख आहे. त्या म्हणतात

    प्रिय, नवरोबा…

    लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलता बोलता मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे. साहेब, मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेली आहे. खरंच भरून गेलीये. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

    मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली.. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे.. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस.. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास.

    आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देणे कमी झालं नाही. मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वश्री जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे.

    आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस हीच कमी पडत आहे. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार हा आहे.

    – दीपाली