आता सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये; यशोमती ठाकूर यांचा बोचरा वार

अमरावतीत आज सहकार पॅनलने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना यशोमती ठाकूर यांनी थेट ईडीची खिल्ली उडवली आहे. आता उद्या ग्रामपंचायत सरपंचांना ईडीची नोटीस आली तर त्यात नवल काही राहणार नाही, असा चिमटा ......

  अमरावती (Amravati) : भाजपच्या आरोपानंतर (BJP’s allegations) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावरून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री (State Minister for Women and Child Development) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ईडीला (Enforcement Directorate) टोला लगावला आहे. आता ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये, असा बोचरी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

  अमरावतीत आज सहकार पॅनलने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना यशोमती ठाकूर यांनी थेट ईडीची खिल्ली उडवली आहे. आता उद्या ग्रामपंचायत सरपंचांना ईडीची नोटीस आली तर त्यात नवल काही राहणार नाही, असा चिमटा यशोमती ठाकूर यांनी काढला आहे. या जिल्हा बँक निवडणूकीत सहकार पॅनल विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच बँकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

  अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक
  अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या 4 ऑक्टोबर रोजी होत आहे. यात बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याने ईडीने बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख व उत्तरा जगताप यांना अगदी निवडणूकीच्या तोंडावर नोटीस दिली आहे. त्यामुळे बँकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे.

  अध्यक्षांना ईडीचे समन्स
  दरम्यान, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावला होता. विरेंद्र जगताप आणि उत्तरा जगताप यांना तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली होती. दुसरीकडे 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे.

  खासगी कंपनीत ७०० कोटी रुपये गुंतवले 
  अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागविले होते. अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.