परभणीनंतर अमरावतीत सुद्धा कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूच्या भितीपोटी प्रशासनाच्या चिंतेत भर

अमरावतीच्या बडनेऱ्यात गावात २८ कोंबड्या दगावल्या असून येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बडनेऱ्यात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव आणि अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ही दुर्दैवी बाब असून त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली.

अमरावती: देशातील सहा राज्यांत बर्ड फ्लूने उच्छाद मांडला आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पक्ष्यांतूनच बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची शक्यता असल्याने व या आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परभणीनंतर आता अमरावतीत सुद्धा अचानकपणे (Sudden death of hens) कोंबड्या दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमरावतीच्या बडनेऱ्यात गावात २८ कोंबड्या दगावल्या असून येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बडनेऱ्यात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव आणि अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ही दुर्दैवी बाब असून त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली. तसेच या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिक भर झाल्याचे दिसत आहे.

डॉक्टरांनीदेखील तातडीने घटनास्थळी सहकार्याला पाठवून कोंबड्यांच्या नाकाद्वारा व गुदद्वारातून नमुने घेण्यास सांगितले. सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर त्या कोंबड्यांचा मृत्यू नेमके कशाने झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.

दरम्यान, परभणीतील मुरूंबा गावात अचानकपणे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काल शनिवारी घडली होती. गावात ९०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु हा मृत्यू कशामुळे झाला ? हे अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ( Department of Animal Husbandry) गावात भेट दिली असता मृत पक्षांचे नमुने (Samples) पुण्याला पाठवले आहेत. तसेच हे नमुने आता उद्या ( सोमवारी ) येणार आहेत.