कोरोनामध्ये पॅरोलवर घरी आलेल्या कैद्यांची जेलमध्ये जाण्याची मागणी, कारण काय? : जाणून घ्या सविस्तर

तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कैदी त्यांच्या घरी पोहोचले. पण आता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्याची मागणी करीत आहेत.

  अमरावती : कोरोनाच्या महामारीमुळे तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कैदी त्यांच्या घरी पोहोचले. पण आता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्याची मागणी करीत आहेत.

  दरम्यान एकीकडे कैदी तुरुंगात गेल्यावर बाहेर निघण्यासाठी धडपड करत असतात. आता मात्र पॅरोलवर सुटलेले कैदी परत तुरुंगात जाण्याची मागणी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 2010 मध्ये अमरावतीच्या मंगरूळ चवाळा गावात वादाच्या वेळी विरोधी पक्षाचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर अनंत चवाळे आणि त्याचा भाऊ यांना अटक करण्यात आली होती. अनंत आणि त्याच्या भावाला 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला. अनंत चवाळे हे 2013 पासून अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. नुकतीच मे 2020 मध्ये त्याला पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.

  पुन्हा तुरूंगात जाण्याची मागणी

  अनंत, त्यांची पत्नी आणि 12 वर्षांचा मानसिक आजाराने त्रस्त मुलगा एका भाड्याच्या खोलीत गुजराण करीत आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्य सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले खरे पण त्यांना दोन वेळेचं अन्न मिळणे कठीण झाले आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही चांगला नाही. त्यांना रोजगार देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे अनंत यांना वाटते की त्यांच्यासाठी तुरूंग बरा आहे. अनंत म्हणतात.. मला पुन्हा तुरूंगात जायचे आहे.

  अनंतची पत्नी आपल्या एका अपंग मुलासह भाड्याने घेतलेल्या एका खोलीत राहते. काही घरगुती कामे करुन तिला फक्त 2300 रू महिना मिळतो. आता 2300 रूपयांमध्ये मुलाला व पतीला तिच्याबरोबर राहणे कठीण झाले आहे. म्हणून तिलाही असे वाटते की नवरा तुरूंगात राहिला तर बरे. गेल्या कित्येक वर्षांपासून कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणारे वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवी वैद्य सध्या पॅरोलवर असलेल्या कैद्यांना व इतर गरजूंना दररोज विनामूल्य भोजन पुरवतात. सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले खरे मात्र रोजगार नसल्याने त्यांच्यासमोर मोठी बिकट समस्या निर्माण झाली आहे. सरकारने रोजगार किंवा काही पॅकेज देखील द्यावीत अशी मागणी वऱ्हाडचे रवींद्र वैद्य यांची आहे.