Soyabean damage in Wardha district

गेल्या आठवड्यात वाढलेले सोयाबीनचे भाव या आठवड्याच्या  पहिल्याच दिवशी कोसळले आहेत. ढगाळ वातावरण व पावसाची शक्‍यता बघता बाजार समितीमधील आवक मंद असताना भाव तब्बल तीनशे रुपये प्रती क्विंटलने घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हे भाव इतक्यात वाढणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

अमरावती : गेल्या आठवड्यात वाढलेले सोयाबीनचे भाव(soyabean rate) या आठवड्याच्या  पहिल्याच दिवशी कोसळले आहेत. ढगाळ वातावरण व पावसाची शक्‍यता बघता बाजार समितीमधील आवक मंद असताना भाव तब्बल तीनशे रुपये प्रती क्विंटलने घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हे भाव इतक्यात वाढणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

यंदा सोयाबीनचे अती पाऊस व किडरोगांमुळे नुकसान झाले आहे. गरजेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच दर्जाही घसरला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये उत्पादनाची सरासरी हेक्‍टरी तीन ते चार क्विंटल आहे. उर्वरित तालुक्‍यातील काही भागातच शेतकऱ्यांना सरासरी बारा ते तेरा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यातही सुपर दर्जाचा सोयाबीन तुलनेने कमी आहे.

अमरावती बाजार समितीत गेल्या आठवड्यात हमीदरापेक्षा अधिक भाव मिळाला. सुपर दर्जाच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ४,३०० रुपयांपर्यंत कमाल, चार हजार रुपये किमान, तर मध्यम दर्जाच्या सोयाबीनला ३४०० ते ३७०० रुपये भाव मिळाला होता. या सप्ताहात सोमवारी पहिल्याच दिवशी हे भाव तब्बल तीनशे रुपयांनी घसरले. सोमवारी बाजार समितीत ३३५५ पोत्यांची आवक झाली. उत्तम दर्जाच्या सोयाबीनला सोमवारी ४ हजार ते ४२६५ व मध्यम दर्जाच्या सोयाबीनला ३५५० ते ३८५०रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. या बाजार समितीमधून छत्तीसगड, मध्य प्रदेश या प्ररप्रांतासह कोईमतूर येथील सोयाबीन प्लांट खरेदी करतात. त्यांनी या आठवड्यात भाव कमी केल्याने त्याचे परिणाम स्थानिक बाजारावर पडल्याचे अडते राजेश पाटील यांनी सांगितले.

दिवाळीनंतर बाजार सुरळीत झाल्यानंतर सोयाबीनची आवक वाढली होती. मध्यंतरी कामगारांच्या आंदोलनाचा आवकवर परिणाम झाला. मात्र, त्यानंतर या महिन्यात बाजार सुरळीत झाला. त्यामुळे दररोज आठ हजार पोत्यांच्या जवळपास आवक होऊ लागली होती. शनिवारपासून वातावरणातील बदलामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. सोमवारी सोयाबीनची केवळ साडेतीन हजारच्या जवळपास पोत्यांची आवक झाली. त्यामुळे बाजार लवकरच उठला.

यंदा सोयाबीनला लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. कमी उत्पादनामुळे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीन प्लांट धारकांनी खरेदी कमी केल्याने व भाव कमी केल्याने त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर पडू लागला आहे, असे बाजार समितीमधील अडते व खरेदीदार राजेश पाटील यांनी सांगितले.