शासनाकडून मिळालेली भूखंडाची २३.५० लाखांची रक्कम दुसऱ्यांनी लाटली; गांधी जयंतीला आत्मदहनाचा प्रयत्न

बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सद्य:स्थितीत अमरावतीत राहत असून बांधकाम मजूर म्हणून काम करतात. त्यांच्या मालकीचा एक भूखंड घुईखेड परिसरात होता. तो बेंबळा प्रकल्पामध्ये गेला.

    अमरावती (Amravati) : बेंबळा प्रकल्पामध्ये गेलेल्या मालकीच्या भूखंडाची शासनाकडून मिळालेली २३.५० लाखांची रक्कम दुसऱ्यांनी लाटली. प्रशासनाने त्याबाबत काहीच दखल घेतली नाही. असा आरोप करणाऱ्या घुईखेड येथील व्यक्तीने सिंचनभवनासमोर शनिवारी (ता. २) गांधी जयंतीच्या दिवशी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

    पुंडलिक नारायण बागडे (वय ५५) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन सदर व्यक्तीला पकडले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सद्य:स्थितीत अमरावतीत राहत असून बांधकाम मजूर म्हणून काम करतात. त्यांच्या मालकीचा एक भूखंड घुईखेड परिसरात होता. तो बेंबळा प्रकल्पामध्ये गेला.

    त्यांनी आपल्या जमिनीवर एक छोटेसे नागमंदिर सुद्धा बांधले होते. भूखंड प्रकल्पामध्ये गेल्यानंतर दुसऱ्याच दोघांनी तो भूखंड स्वत:चा असल्याचे दाखवून, शासनाकडून आलेल्या रकमेचे २० लाख रुपये आणि ३ लाख ६४ हजार रुपये असे दोन धनादेश बँकेत जमा करून रक्कम हडपली. मालकीची जमिनही गेली. मोबदलाही मिळाला नाही, म्हणून बागडे यांनी जिल्हाधिकारी आणि सिंचन विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. त्यामध्ये १४ सप्टेंबर २०२१ रोजी संबंधितांवर कारवाई होऊन मोबदला स्वत:ला मिळावा यासाठी बागडे यांनी पुन्हा या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

    ३० सप्टेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास २ ऑक्टोबर गांधीजयंतीला सिंचन भवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. ते शनिवारी (ता. २) सकाळी साडेदहाच्या सुमारास सिंचन भवनासमोर आले. पोलिस दुसरीकडे तैनात होते. बागडे यांनी तेथेच सोबत आणलेले पेट्रोल अंगावर घेतले. पोलिसांनी त्यांना तातडीने आटोक्यात घेऊन इर्वीनमध्ये दाखल केले. त्यांनी स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.