गाड्या कुजल्या पण हर्रास नाही; कोट्यवधीची मालमत्ता भंगारात

सरकारच्या विविध विभागात कालबाह्य झालेली वाहने विकून तिजोरीत पैसे जमा केले जाऊ शकतात. परंतु तालुक्यातील बहुतांश शासकीय विभागात कालबाह्य झालेली वाहने गेल्या अनेक वर्षांपासून भंगार अवस्थेमध्येच धुळखात पडली आहेत. वाहने कुजण्याच्या अवस्थेत आहेत.

    धारणी (Dharani).  सरकारच्या विविध विभागात कालबाह्य झालेली वाहने विकून तिजोरीत पैसे जमा केले जाऊ शकतात. परंतु तालुक्यातील बहुतांश शासकीय विभागात कालबाह्य झालेली वाहने गेल्या अनेक वर्षांपासून भंगार अवस्थेमध्येच धुळखात पडली आहेत. वाहने कुजण्याच्या अवस्थेत आहेत. तरी देखील अद्यापपर्यंत लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाची कोट्यवधींची मालमत्ता भंगार अवस्थेतच पडून आहे.

    धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद विभाग, वनविभाग, आदिवासी विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर ठिकाणी शासकीय मालमत्ता भंगार अवस्थेत पडून कुजत आहे. जर वेळीच या कालबाह्य शासकीय मालमत्तेचा हर्रास केला असता, तर हर्रासातून शासनाच्या तिजोरीत पैसे सुध्दा जमा झाले असते.

    चोरी जात आहे वाहनांचे सुटे भाग
    धारणी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात रोडरोलर, जिल्हा परिषदेत टँकर, रोडरोलर, आदिवासी महामंडळात मोठ्या संख्येने ट्रक, ट्रॅक्टर व जीपगाड्या भंगार अवस्थेत पडून आहेत. तर वनविभागात सुद्धा असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने एकाच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे याचाच फायदा चोर घेत आहे.

    भंगार अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचे सुटे भाग चोरी गेल्याचेही आढळून येत आहे. गेल्यावर्षी धारणी प्रकल्प कार्यालयातील एक जिप्सी व एक मार्शल हर्रास करण्यात आली होती. अशाचप्रकारे इतर विभागाने भंगार अवस्थेत पडलेल्या शासकीय मालमत्तेचा हर्रास करून विभागातील परिसर स्वच्छ ठेवावा आणि शासनाच्या तिजोरीत भर टाकण्याची आवश्यकता आहे. परंतु धारणीतील विभागाला जाग केव्हा येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.