पुसला येथे पॉझिटिव्हची संख्या जास्त; सर्दी, तापाने अनेक कुटुंबे बेजार

येथील आकडेवारीनुसार 15 दिवसात 28 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या जेमतेम आहे. अनेक कुटुंबे सर्दी, ताप, खोकल्याने बेजार आहे. कोरोना चाचणी करून घेण्याच्या भीतीमुळे थातूरमातूर उपचार घेऊन घरीच विलगीकरणात राहात आहेत.

    पुसला (Pusla).  येथील आकडेवारीनुसार 15 दिवसात 28 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या जेमतेम आहे. अनेक कुटुंबे सर्दी, ताप, खोकल्याने बेजार आहे. कोरोना चाचणी करून घेण्याच्या भीतीमुळे थातूरमातूर उपचार घेऊन घरीच विलगीकरणात राहात आहेत. जनजागृतीचा अभाव, राजकीय वैफल्यामुळे येथे कोरोनाचा वणवा पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.

    २८ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
    15 ते 30 एप्रिलपर्यंत 28 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात सर्दी, ताप, खोकल्याने अनेक कुटुंब बेजार आहेत. थातूरमातूर उपचार घेऊन घरीच विलगीकरण करून घेतले आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येताना कुणी तयार नाही. पॉझिटिव्ह आल्यास उपचार व इतर धावपळ होऊ नये यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समजते. पॉझिटिव्हचा आकडा फुगण्याआधी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    पाणीटंचाई ठरत आहे कारणीभूत
    पुसला येथे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागणे ही नित्याची बाब आहे. पाण्याचे स्रोत मुबलक असूनही नियोजनामुळे आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. यामुळे सार्वजनिक व खासगी विहिरीवर पाणी भरण्याची एकच गर्दी होते. ही गर्दीसुद्धा कोरोना संसर्गाकरिता कारणीभूत ठरत आहे.

    दारूमुळेही वाढत आहे कोरोना
    कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे दारूची दुकाने बंद हे फक्त सांगण्यासाठी आहे. प्रत्यक्षात देशी व मोहाची दारू खुलेआम उपलब्ध होत असल्यामुळे पिणारेही गर्दी करीत आहेत. यामुळे कोरोनावाढीला दारूही कारणीभूत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

    सूचनांचे पालन नाही
    या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. परंतु बहुसंख्य नागरिक पालन करताना दिसत नाही. समाजधुरीण म्हणवून घेणारे मुद्दाम उल्लंघन करताना दिसतात. एका लग्नप्रसंगी 300 ची उपस्थिती जुळवून पाठ थोपटून घेतली. नागरिक अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कठोर पावले उचलण्याची गरज जबाबदार नागरिक व्यक्त करीत आहेत.