पावसाचं तांडव ! मुसळधार पावसामुळे बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून

शेतकरी बैलगाडी काढत असताना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेला आहे. बैलांनी दोरखंड तोडल्याने बैल बाहेर पडलेत. मात्र, काही अंतरावर त्याचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला.

    अमरावती (Amravati) : कालपासून पावसाची संततधार सुरूच आहे. बुधवारी दुपारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक परिसरातील नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यात विरुळ रोंघे येथील वयोवृद्ध शेतकरी श्रावण लांजेवार हे पाऊस सुरू असल्याने शेतातून घरी परतत असताना बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे.

    विरुळ रोंघे रामगाव शिवारातील पाझर नाल्यातून बैलगाडी काढत असताना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेला आहे. बैलांनी दोरखंड तोडल्याने बैल बाहेर पडलेत. मात्र, काही अंतरावर त्याचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला. श्रावण यांच्या आकस्मित मृत्यूने विरुळ रोंघे गावात शोककळा पसरली आहे. सद्या त्यांचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

    दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापुर परिसरातही रात्री ढगफुटीसदृश्य (Heavy Rain) पाऊस झाला आहे. या पावसामुळे इस्लापुर परिसरात सर्वत्रच पाणी साचल्याचे चित्र आहे. या भागातील परोटी, रिठा आणि नांदगाव गावाच्या शिवारात पावसाचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे अनेक पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.