फोन आला आणि तो म्हणाला, तुझ्या आईचा अपघात झाला आहे, तू लवकरात लवकर रुग्णालय पोहोच….

आईचा अपघात झाल्याची बतावणी करीत दोन बहिणींपैकी एकीचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जुन्या धामणगाव परिसरातील एका कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीबाबत काही महिन्यांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती.

    अमरावती (Amravati). आईचा अपघात झाल्याची बतावणी करीत दोन बहिणींपैकी एकीचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जुन्या धामणगाव परिसरातील एका कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीबाबत काही महिन्यांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती. या घटनेच्या संबंधाने २० जुलै रोजी साक्ष नोंदविण्यासाठी तिची आई अमरावती येथे गेली होती.

    दरम्यान, दुपार १ वाजेच्या सुमारास दोघी बहिणी घरी असताना एक फोन आला. यावर तुझ्या आईचा अपघात झाला आहे, तू लवकरात लवकर धामणगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे पोहोच, असे सांगण्यात आले. दोघी बहिणींनी शास्त्री चौक परिसरातील ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.

    दरम्यान, स्त्री चौक, सिंधी कॅम्प परिसरात या दोघी बहिणींना तीन अनोळखी युवकांनी अडवले व मोठ्या बहिणीला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने टाकून तिथून पळून गेले. आई परत आल्यानंतर लहान बहिणीने सदरची घटना आईला सांगितली. कुटुंबाने तत्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन गाठले व सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दत्तापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

    चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी तातडीने पोलीस ठाण्यास भेट दिली. पुढील तपास दत्तापूर ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय द्वारका अंभोरे करीत आहेत.