तेराशे कोविड़ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याने ठिय्या आंदोलन

    अमरावती (Amravati) :  गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्रासह अमरावती जिल्हातील कोविड रुग्णालयात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रत्येक कोविड सेंटरवर कंत्राटी डॉक्टर,सिस्टर, ब्रदर, टेक्निशियल, कक्षसेवक, सफाई कामगार यांनी कोविड रुग्णांची अविरतपणे सेवा करूण प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या कोविड़ योद्धांनी केला; पण गेल्या दोन महिन्यापासून पगार झालेला नाही.

    सर्व कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असताना या जिल्ह्यातील 1386 सर्व कंत्राटी कर्मचा-यांना नोकरीतून कमी करण्याचे व कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाची दुसरी लाट अमरावती जिल्ह्यातून आली असताना जिल्ह्यामध्ये मृत्यूचा आकडा वाढत आहे. याच कर्मचाऱ्यांनी सेवा दिली; मात्र आता “गरज सरो आणि वैद्य मरो’अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. या नितीविरुद्ध सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला व आम्हाला त्याच कामावर कार्यरत ठेवावे, अशी मागणी केली आहे.