भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी, ‘या’ नेत्याचा दावा

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.

    अमरावती : भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान नाना पटोले सध्या मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलंय.

    भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र जोमाने लढतील, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केलाय.

    तसेचं धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.