टाकरखेडा संभू येथे दोन घरांना आग; जीवनावश्यक वस्तुसह जमा पुंजीही झाली राख

रुख्माबाई चव्हाण या विधवा असून, त्यांना तीन मुली आहेत. त्यामुळे मोल मजुरी करून त्यांनी २० हजार रुपयांची पुंजी जमा केली होती. परंतु घराला लागलेल्या आगीमध्ये घरगुती साहित्या बरोबरच जमा केलेली २० हजार रुपयांची पुंजीही राख झाली आहे. त्यामुळे रुख्माबाई यांच्यावर चांगलेच संकट कोसळलले आहे.

    टाकरखेडा संभू. येथील ब्रिटीशकालीन पोलिस वसाहतीत दोन घरांना सोमवार 15 मार्चला सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये  दोन्ही घरातील घरगुती साहित्य तसेच रुख्माबाई चव्हाण यांनी मोल मजुरीतून जमा केलेली 20 हजार रुपयांची जमा पुंजीही राख झाली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी तत्काळ  सतर्कता बाळगत आग विझविल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

    टाकरखेडा संभू येथील बस स्टँडच्या बाजूला असलेल्या इंग्रज कालीन पोलिस स्टेशनच्या क्वॉर्टरमध्ये काही कुटुंब वास्तव्यात आहे. सकाळी आठ वाजताच्या सुमारास रूख्माबाई चव्हाण यांच्या घराला आग लागली.  या आगीमध्ये त्यांच्या घरातील संपूर्ण घरगुती साहित्यासह धान्य जळून खाक झाले आहे. त्याच बरोबर त्यांनी एका पेटीमध्ये मजुरीतून जमा केलेली वीस हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे. याच बरोबर त्यांच्या घराशेजारी राहत असलेल्या त्यांच्या सासू  मंजुळाबाई चव्हाण यांचे घर देखील आगीच्या तावडीत आले. त्यामुळे दोन्ही घरातील जीवनावश्यक घरगुती वस्तू जळून खाक झाले आहे. यावेळी आगीची माहीतीच मिळताच परीसरातील सर्व नागरिकांनी आग विझवली. त्यामुळे यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रुख्माबाई यांनी सकाळी नेहमी तुराटी पेटवून त्यावर चहा केला. याच तुराट्याची काडी ही हवेमुळे उडाल्याने घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसली तरी मात्र दोन्ही कुटूंब उद्ध्वस्त झाले असून, रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या कुटूंबाला आर्थीक मदत देण्याची मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    मोलमजुरीतून जमा केलेली पुंजी खाक

    रुख्माबाई चव्हाण या विधवा असून, त्यांना तीन मुली आहेत. त्यामुळे मोल मजुरी करून त्यांनी २० हजार रुपयांची पुंजी जमा केली होती. परंतु घराला लागलेल्या आगीमध्ये घरगुती साहित्या बरोबरच जमा केलेली २० हजार रुपयांची पुंजीही राख झाली आहे. त्यामुळे रुख्माबाई यांच्यावर चांगलेच संकट कोसळलले आहे.