शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा; संगीता शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरण करणे तसेच आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असण्याची अट ठेवण्यात आलेली आहे. परीक्षा प्रक्रियेत शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी मोठ्या संख्येने संबंध येणार आहे.

    अमरावती (Amaravati).  राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरण करणे तसेच आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असण्याची अट ठेवण्यात आलेली आहे. परीक्षा प्रक्रियेत शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी मोठ्या संख्येने संबंध येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे नंतरच त्यांना परीक्षा प्रक्रियेत सामावून घ्यावे, अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    राज्य शासनाने राज्यात 30 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन केला असून शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असून त्यासाठी शासनाची तयारी सुरू आहे. मात्र परीक्षा घेण्यापूर्वी शिक्षकांना लसीकरण करून घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असावी अशी अट घालण्यात आली आहे. सद्यस्थितीत शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी लसीकरण करण्याची सोय उपलब्ध नाही.

    केवळ 45 वर्षे वयावरील नागरिकांनाच याचा लाभ घेता येत आहे. मात्र बहुतांश शिक्षक हे या वयोमर्यादेत बसत नसल्यामुळे त्यांची इच्छा असताना देखील त्यांना लस दिली जात नाही. त्यामुळे राज्य शासनाचा आदेश निव्वळ कुचकामी ठरत असल्याचे संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    परीक्षेपूर्वी राज्यातील संपूर्ण शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण केल्यास त्याचा शिक्षण प्रक्रियेवर अनुकुल परिणाम होईल. त्यामुळे राज्य सरकारने शिक्षकांचे लसीकरण करण्याचा उपक्रम प्राधान्याने हाती घ्यावा, अशी मागणी संगीता शिंदे यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.