अमरावतीत सात वर्षीय चिमुकलीवर युवकाचा बलात्कार

पीडित चिमुकली ही आपल्या मैत्रिणीसोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. यावेळी गावातील वीस वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं. आरोपीने चिमुकलीला स्वतःच्या शेतात नेलं आणि .....

  अमरावती (Amravati) : मुंबईतील साकीनाका, ठाण्यातील उल्हासनग, पुणे, तसेच अमरावतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरुन गेले असतानाच आज पुन्हा अमरावती जिल्ह्यात अत्याचाराची घटना समोर आली आहे. सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता राज्यात कायदा आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  वीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार
  अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्या अंतर्गत अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित चिमुकली ही आपल्या मैत्रिणीसोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. यावेळी गावातील वीस वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं.

  नेमकं काय घडलं?
  आरोपीने चिमुकलीला स्वतःच्या शेतात नेलं आणि तिथं तिच्याशी बळजबरी केली, तसंच नको त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन नराधम युवकाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  अमरावतीत कालही अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  दरम्यान, अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे. यातून ती 7 महिन्याची गर्भवती राहिली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.