पुसेसावळीत १०० बेड्सचे रुग्णालय उभारणार : धैर्यशील कदम

आजाराचा, औषध उपचाराचा अवाढव्य खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. महामारीच्या काळात कोरोनावरच जास्त फोकस झाल्यामुळे इतर आजार लोकांना अंगावर काढण्याची वेळ आली. या सर्व गोष्टींचा विचार करुन सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे.

    औंध : आजाराचा, औषध उपचाराचा अवाढव्य खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. महामारीच्या काळात कोरोनावरच जास्त फोकस झाल्यामुळे इतर आजार लोकांना अंगावर काढण्याची वेळ आली. या सर्व गोष्टींचा विचार करुन सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे. आरोग्याच्या सोईसुविधासाठी लोकांना शहरापर्यंत धावपळ करावी लागू नये यासाठी लवकरच पुसेसावळीत १०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय उभारणार असल्याची ग्वाही वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली.

    पुसेसावळी येथे विक्रमबाबा सोशल फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, डॉ. चिन्मय एरम, डॉ. सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कदम, माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, श्रीकांत पाटील, वेताळभक्त दादा महाराज, सुरेश पाटील, विक्रमशिल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, कान, नाक आणि डोळे याशिवाय तपासणीत आढळणाऱ्या आजारावर उपचार व शस्त्रक्रिया होणार आहे. तपासणी झाल्यानंतर ऑपरेशन कराव्या लागणाऱ्या रुग्णांची यादी करुन त्यांच्यावर कराड  येथील शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्यात येतील.

    रुग्णांच्या निवास, जेवण, प्रवास खर्च विक्रमबाबा सोशल फाऊंडेशन मार्फत करण्यात येईल. या भागातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम करून पाठराखण केली आहे.  घाटमाथ्यावर संध्याकाळी सात नंतर माणूस थांबत  नव्हता अशा निर्जन माळरानावर वर्धन कारखाना दिमाखाने उभा आहे. कारखान्याच्या माध्यमातून 1000 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. यापुढे आरोग्य क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    शिबिरासाठी  सिव्हिल हॉस्पिटल सातारा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, युनिक डायग्नोस्टिक पुसेसावळी, श्री शाहू नेत्र रुग्णालय सातारा व एरम हॉस्पिटल कराड यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी मानसिंगराव माळवे, डॉ. चिन्मय एरम, प्रशांत बधे यांनी मनोगत व्यक्त केले.

    वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम यांनी प्रास्ताविक केले तर सुनीता कदम यांनी आभार मानले. यावेळी अनिल माने, अकबर बागवान, महेश पाटील, उदय गुरव, समरजित सिह राजेभोसले, नितीन वीर, राजेंद्र माळवे, सतीश सोलापुरे, बापूसाो थोरवे  परिसरातील ग्रामस्थ रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी विक्रमबाबा फाउंडेशनचे आशपाक बागवान ,तुषार मोहिते, चंद्रकांत घार्गे, इस्माईल संदे, अनिकेत कोकाटे, अन्सार संदे, तसेच वर्धन अँग्रोच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.