कोकेन बाळगणारा परदेशी तरुण जेरबंद, ११ लाखांचे कोकेनही हस्तगत; इस्लामपूर पोलिसांची कारवाई

पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या परदेशी तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

    इस्लामपूर : पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या परदेशी तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

    तरुण टान्झानियाचा…

    माकेटो जॉन झाकिया (२५, रा. जमोरिया मंगानो, टान्झानिया) असे संशयित आरोपींचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस (क्र. केए ५१ एएफ ६२९१) मधून अमली पदार्थजवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला.

    बसची झडती घेतली असता झाकिया हा आसन क्र. एल-१३ बसला होता. त्याच्या बॅगमध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आला. अमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे (Islampur Police) हवालदार दीपक ठोंबरे यांनी माहिती दिली. झाकिया विरुध्द गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.