१२ वर्षीय मुलीला प्रेमजाळात अडकवून मुलीचे अपहरण; पोलिसांकडून युवकाला अटक

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून १२ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी चंद्रपूरमध्ये अटक केली. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली.

    नागपूर (Nagpur) : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून १२ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी चंद्रपूरमध्ये अटक केली. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली. सागर कंठीराम परचाके (वय २३, रा. किनार मडकी), असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो बुटीबोरीतील कंपनीत काम करतो. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला सागर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ३१ ऑक्टोबरला त्याने मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

    पोलिस अधीक्षक वियजकुमार मगर यांनी याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हेशाखेकडे सोपविला. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, हेडकॉन्स्टेबल गजेंद्र चौधरी, महेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सागर याचा शोध सुरू केला. सागर हा मुलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सागरला अटक केली. मुलीची सुटका करून तिला नातेवाइकांच्या स्वाधीन केले.