बिहारच्या 2 महिला कॉन्स्टेबलचे होतय कौतुक! बँकेवरील दरोडा रोखण्यासाठी भिडल्या दरोडेखोरांना, पाहा Video

बिहारमधील वैशाली येथे दोन महिला कॉन्स्टेबलनी गुरुवारी असे धाडस दाखवले की एक बँक लुटण्यापासून वाचली. आता बिहार पोलिसांच्या या दोन धाडसी महिला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  वैशाली :  बिहारमधील वैशाली (Vaishali) येथे दोन महिला कॉन्स्टेबलनी ( Female Constable )  दाखवलेल्या धाडसचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या धाडसाने या दोन महिला हवालदारांनी बँक लुटण्यासाठी आलेल्या दरोडोखोरांना चांगलीच अद्दल घडवली, शिवाय त्यांना तेथून पळ काढण्यास भाग पाडले.

  आता या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो बिहार पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली आहे.

  नेमकं काय घडलं?

  सकाळचे 11 वाजले होते आणि सेंदुवारीच्या उत्तर बिहार ग्रामीण बँकेत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. दरम्यान बँकेच्या दारातून दोघेजण आत शिरले. दोन्ही चोरटे आत येताच सुरक्षा कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल जुही आणि शांती कुमारी यांनी त्यांच्याकडे पासबुक मागितले.
  यानंतर चोरटे आणि दोन महिला कॉन्स्टेबलमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर एका चोरटयाने थेट त्यांना बंदुकीचा धाक दाखवला हे पाहून शांती आणि जुहीने त्यांच्या एसएलआर रायफल काढल्या आणि दोन्ही बदमाशांकडे बोट दाखवून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. हे पाहून एका दरोडेखोराने महिला कॉन्स्टेबलची हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जुहीने ती लोड केली आणि ती गोळी मारणार असल्याचे सांगितले. हे पाहून चोरटे घाबरले आणि त्यांना बँक सोडून पळून जावे लागले

  बँकेत बरीच रोकड होती

  बँक लुटण्यासाठी पाच जणांच्या संख्येने आलेले चोर महिला कॉन्स्टेबल शांती कुमारी आणि जुही यांना इतके घाबरले की त्यांनी घाईघाईने त्यांच्या दोन दुचाकी तेथेच सोडल्या. ज्या नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्या. ही घटना घडत असताना बँकेत 10 लाख रुपयांची रोकड होती.

  काय म्हणाल्या कॉन्स्टेबल

  कॉन्स्टेबल शांती आणि जुही यांनी घटनेबद्दल सांगितले, ‘आम्ही विचारले की तिघांना काम आहे का? तर म्हणाले की हो तिघांना काम आहे, म्हणून आम्ही पासबुक दाखवा म्हणालो, दाखवले नाही, थेट पिस्तूल दाखवले. त्याने माझी रायफल हिसकावून घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर आम्ही गोळीबार करण्यासाठी येथे धावलो, आम्ही गोळीबार सुरू केला तेव्हा ते लोक पळून गेले.

  दरोड्याचे वृत्त पसरताच बँकेबाहेर जमाव जमला, त्यानंतर पोलीस विभागातील उच्चपदस्थांनी बँकेत धाव घेतली. दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि दोन्ही महिला पोलिसांचे जोरदार कौतुक केले.

  एसपीने बक्षीस जाहीर केले

  या घटनेबाबत बँकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बँकेत ६ लोक हजर होते जे त्यांचे काम करत होते. दरम्यान, महिला कॉन्स्टेबलची गेटवर चोरट्यांशी झटापट झाली, त्यानंतर त्यांनी आपली शस्त्रे काढून घेतली. मात्र, दोघींनी हिंमत दाखवत त्या चोरट्यांना पिटाळून लावले. या प्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. तर, या दोन्ही महिला कॉन्स्टेबलचे धाडस पाहून वैशाली जिल्ह्याचे एसपी मनीष यांनीही त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

  दोन्ही महिला पोलीस नालंदा येथील रहिवासी

  बदमाशांशी कडवी झुंज देणारे बिहार पोलिसांचे दोन्ही शूर जवान बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मुली त्याच गावातील आहेत.