जामखेडला १२ वार्डात २४ नगरसेवक; नगरसेवकांची संख्या वाढली तीनने

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत (Jamkhed Nagar Parishad Election) शासनाच्या नवीन नियमानुसार १२ प्रभागातून २४ नगरसेवक नगरपरिषदेत शहराचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यापूर्वी १२ वार्डातून २१ नगरसेवक होते. त्यात तीनने भार पडून नगरसेवकांची संख्या २४ झाली आहे.

    जामखेड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड नगरपरिषद निवडणुकीत (Jamkhed Nagar Parishad Election) शासनाच्या नवीन नियमानुसार १२ प्रभागातून २४ नगरसेवक नगरपरिषदेत शहराचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यापूर्वी १२ वार्डातून २१ नगरसेवक होते. त्यात तीनने भार पडून नगरसेवकांची संख्या २४ झाली आहे. जागा वाढल्याने इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

    नगर परिषद निवडणुकीबाबत शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिकांची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जामखेड नगरपरिषदेने यापूर्वी असलेल्या प्रभाग रचनेत बदल करून १२ प्रभागातून  नगरसेवक पदाच्या २४ जागा निश्चित केल्या असून, याबाबत संख्या व प्रभाग रचना निश्चितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. नवीन प्रस्तावानुसार या पंचवार्षिक निवडणुकीत ३ नगरसेवक सदस्य संख्या वाढणार आहे.

    प्रशासक राज, मागील वर्षीची प्रक्रियाही रद्द

    जामखेड नगरपरिषदेची मुदत ७ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आली आहे. सद्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मागील वर्षी ११ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत एक प्रभाग एक नगरसेवक यादृष्टीने २१ प्रभाग २१ नगरसेवक अशी प्रक्रियाही पार पडली होती. यावेळी प्रभाग रचना व मतदाराचे बदललेला प्रभाग याबाबत तक्रारी राज्य निवडणूक आयोगापर्यंत गेल्या होत्या. त्याबाबत हरकती निकाली काढण्यात येऊन केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी होते. मात्र कोरोना महामारीमुळे निवडणूक लांबणीवर पडली होती.