कळंबोली लोखंड पोलाद बाजारात झालेल्या स्फोटात जखमीपैकी ३ जणांचा मृत्यू

कंटेनर कटिंग करत असताना झाला होता स्फोट, पाच कामगार झाले होते जखमी.

    पनवेल, ग्रामीण : कळंबोली लोखंड आणि पोलाद बाजारात कंटेनर कटिंग करत असताना झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांपैकी एका 23 वर्षीय कामगाराचा बुधवारी दिनांक ३१ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. यामुळे मृताचा आकडा आता ३ वर पोहचला असून, स्फोटात जखमी झालेल्या इतर दोघांवर कुर्ला येथील हबीब रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

    घडलेल्या घटनेनुसार लोखंड आणि पोलाद बाजारात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहण्याची आणि कटिंग करण्याचे काम करण्यात सुरु असते. अशाच प्रकारे एका ठिकाणी रासायनिक सामानाची वाहतूक करणाऱ्या एका वाहणाची कटिंग करण्याचे काम सुरु होते. या वेळी रसायनांमुळे निर्माण झालेल्या घातक गॅसची गळती झाल्याने इलेक्ट्रिक मीटरमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या ठिणग्या उडाल्यामुळे आगीच्या भडक्यात काम करणारे पाच कामगार जखमी झाले आहेत.

    जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता जखमीपैकी दोघांचा अगोदरच मृत्यू झाल्याचे आणि मोहम्मद खाना या कामगाराचा ३१ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील तपास करून संबंधितावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.