लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या ३४८ कोटींच्या आराखड्यास मंजूरी

इंदापूर तालुक्यातील १० तर बारामती तालुक्यातील ६ गावांमधील जिरायती शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : इंदापूर तालुक्यातील १० तर बारामती तालुक्यातील ६ गावांमधील जिरायती शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    या महत्त्वपूर्ण योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३४ हेक्‍टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील सात गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जिरायती शेती ओलिताखाली येणार असल्याने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचा अधिकृत अध्यादेश गुरुवारी (दि१२) जारी केला आहे. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचा उद्भव उजनी धरणाच्या जलाशयामधून इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून आहे. या योजनेसाठी आवश्यक ०.९० अब्ज घनफूट पाणी उजनी धरणाच्या जलाशयाचे मधून उपसा करण्यात येणार आहे.

    या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मी. व दुसऱ्या टप्प्यात ५१.२० मी व ७३.२० शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील दहा गावातील ४३३७ हेक्टर व बारामती तालुक्यातील सात गावातील २९१३ हेक्टर असे एकुण ७२५० हेक्टर जिरायत भागातील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रस्तावित योजनेच्या लाभ क्षेत्रात या उत्तर बाजूस नवीन मुठा कालव्याचे तर दक्षिण बाजूस निरा डाव्या कालव्याची लाभक्षेत्र आहे. या प्रस्तावित योजनेद्वारे दोन्ही कालव्याच्या मधील सिंचनापासून वंचित असणाऱ्या क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

    महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचा एक भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे, त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय मान्यता बाबतच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    दरम्यान, गेल्या २५ वर्षापासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत या योजनेचा मुद्दा चर्चेत होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय होता.यासाठी भरणे यांनी कसोशीने प्रयत्न केले ,अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

    या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहेत.

    लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना ३० वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापुर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही महिन्यात इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरी देखील घेण्याचे काम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

    अशी आहे योजना…

    कुंभारगांव परिसरातून साधारण ७६५ हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. ६४० हॉर्स पॉवरचे ३ पंप व ५७० हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील ११ हजार एकर शेती ओलिताखाली येईल.

    “लाकडी- निंबोडी या योजनेसाठी खा. शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे मी आभार मानतो. या योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शरद पवारसाहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

    दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री