ड्रेनेजचे काम करताना चेंबरमध्ये पडून ४ जणांचा गुदमरून मृत्यू

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील हद्दवाढ परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या ड्रेनेज लाईनसाठी ठिक ठिकाणी खड्डेही करण्यात आले होते. तर काही ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली होती. त्यामध्ये स्वच्छतेचे कामही सुरू होते.

  नवराष्ट्र / सोलापूर न्यूज नेटवर्क : सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील मुद्रा सन सिटी कोंडानगर येथे ड्रेनेजचे काम करताना चेंबरमध्ये पडून चार कामगारांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवार (दि.२३) घडली.

  बैचेन प्रभु ऋषीदेव (वय ३६, रा. रेवाडी, गुहाटी वार्ड नं. 0८, कन्हेरी, जि. अटरिया, राज्य बिहार), आशिषकुमार भारसिंग राजपूत (वय १७, रा. मगना बहु आहीरवा मैनपुरी, राज्य उत्तर प्रदेश) असे मृतांची नावे आहेत. अन्य दोन मृतांची ओळख पटलेली नाही.

  सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील हद्दवाढ परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या ड्रेनेज लाईनसाठी ठिक ठिकाणी खड्डेही करण्यात आले होते. तर काही ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली होती. त्यामध्ये स्वच्छतेचे कामही सुरू होते. दास कन्स्ट्रक्शन कंपनीला याचा मक्ता देण्यात आला होता. त्यातून बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातून कामगार आणून हे काम करण्यात येत होते. अमृत योजनेअंतर्गत मुद्रा सनसिटी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता करून ब्लॉक झालेली लाईन सुरू करण्यासाठी एक कामगार आतमध्ये ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरला. परंतु तो बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून दुसराही कामगार आतमध्ये गेला असे करून सहाजण त्या चेंबरमध्ये उतरले. परंतु, ते आतमध्ये गुदमरले होते. त्यातच ते बेशुध्द झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या ४ कामगारांना मृत घोषित केले. तर इतर दोघे बेशुध्द झाले आहेत.

  २०१६ पासून महानगरपालिकेच्या या अमृत योजनेचे काम सुरू असून अत्यंत संथ गतीने हे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु ५ वर्षांत २९७ किलोमीटर एवढे काम होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापर्यंत केवळ ५० टक्केच काम झालेले आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी मोठे खड्डे रस्त्यावर खोदून ठेवण्यात आलेले आहेत.

  स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे याबाबत वेळोवेळी तक्रारीही नोंदवल्या आहेत. त्यावरून मनपा आयुक्तांनी मक्तेदाराला नोटीसही बजावली होती. त्यावरून १५ डिसेंबरपासून या कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली होती. अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु, त्या पाईपमधील स्वच्छतेची आणि ब्लॉक काढण्याचे काम सुरू होते. कामासाठी खोदलेल्या दीड मीटर खोलीच्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी एका पाठोपाठ एक असे सहाजण उतरले. परंतु, चार जणांचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी होऊन ही दुर्देवी घटना सोलापूर-अक्कलकोट रोडवर ड्रेनेज लाईन चेंबरचे काम करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. सादूल पंपासमोर ही दुर्घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

  ही घटना घडताच तातडीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. या घटनेमुळे बघ्यांची गर्दी मोठया प्रमाणात झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागेश होटकर आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.