Vaccination
Vaccination

नगर तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या कोरोनाच्या लसीकरणाकरणापासुन लांब आहे. तालुक्यात फक्त ४६ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले असुन चास केंद्रात सर्वाधिक तर देवगाव केंद्रात सर्वात कमी लसीकरण झाले आहे. 

  नगर तालुका : नगर तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या कोरोनाच्या लसीकरणापासून (Vaccination in Ahmednagar) दूर आहे. तालुक्यात फक्त ४६ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले असून, चास केंद्रात सर्वाधिक तर देवगाव केंद्रात सर्वात कमी लसीकरण झाले आहे.
  नगर तालुक्यात तालुका प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांनी एकत्र येत गाव तेथे लसीकरण, आपले गाव आपली जबाबदारी या मोहिमा राबवून लसीकरणासाठी मोठी धडपड केली. मात्र, तरीही तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या लसीकरणापासून लांब आहे. यात १८ वर्षाखालील वयोगटाचाही समावेश आहे. शाळा महाविद्यालये सुरू झाली असली तरी १८ वर्षांखालील वयोगट अद्याप लसीकरणापासून वंचित आहे.
  नगर तालुक्यातील ३ लाख ३१ हजार ४३७ लोकसंख्येपैकी १ लाख ५२ हजार ५४० लोकांनी पहिला डोस घेतला असून, हे प्रमाण ४६ टक्के आहे. तर तालुक्यातील ६२ हजार ६५८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण केवळ १९ टक्के आहे. तालुक्यात चास आरोग्य केंद्रात सर्वाधिक ७२ टक्के लसीकरण झाले असून, सर्वात कमी देवगाव केंद्रात ३१ टक्के इतके लसीकरण झाले आहे.
  तालुक्यातील लसीकरण
  एकुण लोकसंख्या = ३ लाख ३१ हजार ४३७
  पहिला डोस = १ लाख ५२हजार ५४० ( ४६ टक्के )
  दुसरा डोस = ६२ हजार ६५८ ( १९ टक्के )
  लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
  लस उपलब्ध असुन देखील नागरीक लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी जनजागृती करुन लसीकरणाची टक्केवारी वाढवावी. लस घेणे हे फायदेशीर असुन सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
  – डॉ. योगेश कर्डिले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर.