file photo-social media
file photo-social media

  अक्षय फाटक, पुणे : देशासह परदेशात उच्च दर्जाचा ड्रग्ज (मेफेड्रोन) पुरवठा पुण्यातून होत असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षातील ‘ड्रग्ज पेडलर’ (ग्राहकांना किरकोळ स्वरूपात ड्रग्ज पुरवणारे) शोधले असून, ते पेडलर आता रडारवर घेतले आहेत. प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत या पेडलरांना ड्रग्ज कोठून येतो याची साखळी शोधत ती पुर्णपणे उद्धस्थ करण्याचे काम गुन्हे शाखेने हाती घेतले आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन वर्षात झालेल्या ड्रग्ज कारवाईत तब्बल ५० महिलांना अटक केली आहे. तर, ३० परदेशी नागरिकांचा देखील समावेस आहे. या महिलांसह परदेशींवर विशेष लक्ष असणार आहे.

  निसर्गरम्य व शांतताप्रिय शहर मेट्रोसिटी, आयटी हब आणि राज्यातील सर्वात मोठ दुसरं शहर झालं आहे. त्याप्रमाणे लोकसंख्या आणि लोकसंख्येसोबत गुन्हेगारीही तितक्याच पटीने वाढल्याचे दिसत आहे. शिक्षण, नोकरी आणि वेगवेगळ्या निमित्ताने शहरात तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात शहरात ‘नाईट लाईफ’च कल्चरही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, हीच तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. आयटी हब आणि मेट्रोसिटीसोबत तरुणाईला टार्गेटकरून ड्रग्ज तस्करांनी शहरात पाळेमुळे रोवली आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या कारवाईतून पुन्हा एकदा शहरातील ड्रग्जची ‘डिमांड’ तीव्रतेने समोर आली आहे. ललित पाटील व सध्या गाजत असलेले साडे तीन हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातून देशाला औद्योगिककरणाच्या आड ड्रग्ज निर्मितीकरून पुरवठा होत असल्याचेही स्पष्ट झाले.

  यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात किरकोळ स्वरूपात ग्राहकांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ‘ड्रग्ज पेडलर’ रडारवर घेतले आहेत. गेल्या तीन वर्षातील किरकोळ पुरवठादारांची यादी तयार केली आहे. त्यानूसार त्यांच्यावर वॉच ठेवून त्यांच्याकडून साखळी मोढीत काढण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम युद्धपातळीवर तर चालणार आहेच, परंतु, मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवून छोट्या ड्रग्ज पेडलरांना कोण आणि कोठून ड्रग्ज येतो, याचीही पाळेमुळे शोधली जाणार आहेत. सव्वा तीन वर्षातील अशी तब्बल ५३५ जणांची यादी तयार झाली आहे. त्यात काहीजन नव्याने या यादीत समावेश झालेली आहेत. त्यांच्यावरही पोलिसांची नजर असणार आहे.

  ५० महिलांचा अन् ३० परदेशींचा समावेश..

  पुणे पोलिसांनी २०२१ ते २०२४ या कालावधीत शहरात केलेल्या कारवाईत तब्बल ५० महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच ३० परदेशी नागरिकांना देखील पोलिसांनी यादरम्यान अटक केली आहे. त्यांच्यावर देखील पोलीस नजर ठेवून आहेत. ते किरकोळ विक्रेत्यासह साठा ठेवून डिलर देत असल्याचे दिसून आले आहे.

  गुन्हे शाखेचे ऑपरेशन….

  पुणे पोलिसांनी सव्वा तीन वर्षात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज पकडत सव्वा तीन वर्षात ५३५ जणांना अटक केली. बहुतांशजन किरकोळ पुरवठादार आहेत. आता ५० जणांची प्रथम यादी तयार केली असून, त्यांच्यासोबतच इतर राज्यातील व शहरातील देखील गुन्हेगारांची माहिती पुणे पोलिसांनी काढली आहे. त्यानूसार गुन्हे शाखेकडून मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवत कारवाई केली जाणार आहे.

  वर्ष– दाखल गुन्हे— आरोपी (कक्षांत, पुरूष, महिला व परदेशी नागरिक) ड्रग्ज किंमत

  २०२१—१०७—१५४—(पुरूष—१२७, महिला—१४, परदेशी—१३)- २ कोटी ५८ लाख

  २०२२—१५०—२००—(पुरूष—१७३, महिला—२२, परदेशी—५) ७ कोटी १४ लाख

  २०२३—१३५—१९३—(पुरूष –१७२, महिला—१२, परदेशी—९) १३ कोटी ६१ लाख

  २५ फेब्रुवारी २०२४—२६—४६– (पुरूष—४१, महिला—२ परदेशी—०३) ३५८० कोटी ८१ लाख