‘एफडीए’ने जप्त केलेली 506 पोती सुपारी गोदामातून गायब; पोलिसांत गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) एका ट्रान्सपोर्टरच्या कार्यालयातून जप्त केलेली 506 पोती सुपारी गहाळ झाली. ही खळबळजनक घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली.

    नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) एका ट्रान्सपोर्टरच्या कार्यालयातून जप्त केलेली 506 पोती सुपारी गहाळ झाली. ही खळबळजनक घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. एफडीएलाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदवला.

    सोनबालाल नंदलाल चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी ललित प्रभुदास सोयाम यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. चव्हाण हा मेसर्स वर्मा रोडवेज येथे व्यवस्थापक आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी एफडीएच्या पथकाने वडधामनाच्या महादेवनगरातील गोपाल अग्रवालच्या गोदामावर धाड टाकली होती. हे गोदाम वर्मा रोडवेजकडून भाड्याने घेण्यात आले होते. गोदामाच्या झडतीत 690 पोती सडलेली सुपारी मिळाली. एफडीएने सुपारीचे नमुने घेऊन गोदाम सील केले.

    वर्मा रोडवेजचा व्यवस्थापक चव्हाण याला अधिकृतरित्या फॉर्म 2 व 3 देऊन तपास पूर्ण होईपर्यंत सुपारीची सुरक्षा करण्याचे आदेश देण्यात आले होते. चव्हाणने गोदामातून सुपारी चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. या माहितीवरून सोयाम यांनी तत्काळ पथकासह गोदामाचे निरीक्षण केले. यावेळी गोदामात केवळ 184 पोती सुपारी मिळाली. 506 पोती सुपारी गहाळ होती. जप्त मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी चव्हाणवर होती. चव्हाणने हेराफेरी करून एफडीएची सील तोडली आणि माल गहाळ केला.