गुजरातमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळ जप्त

नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे. तांदूळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांसह २८ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

  नंदुरबार : नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे. तांदूळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांसह २८ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  दरम्यान पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल तांदूळाची धुळे चौफुली परिसरातून गुजरात राज्याकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

  नेमकं तांदूळ कसा जप्त केला? 

  तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक क्र.(एमएच २३ एयू ५५५६)धुळे चौफुलीजवळ आले असता सदरचे वाहन अडविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात ५ लाख १३ हजार ३६५ रुपये किंमतीचे ५०० गोण्यांमध्ये २५० क्विंटल तांदूळ आढळून आला. सदरच्या गोण्यांवर काहीही लिहिलेले किंवा छापलेले दिसून आले नाही. दरम्यान वाहनातील दोघांकडून सादर करण्यात आलेली बिले हस्तलिखित व संशयास्पद असल्याने सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन वाहनासह जप्त करण्यात आला.

  तसेच ट्रक क्र.(एमएच १६ एवाय ६४६७) हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यातदेखील ५०६ गोण्यांमध्ये ५ लाख २८ हजार ७७० रुपये किंमतीचा सुमारे २५३ क्विंटल तांदूळ आढळून आला. दरम्यान, वाहनचालक सुलेमान अजमखान याने सादर केलेली ई-वे बिलात नमूद वेळ व नंदुरबारसाठी येण्याचा वेळ यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. यामुळे सदरचा तांदूळ हा अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे. दोन्ही वाहनातील १० लाख ४२ हजार १३५ रुपयांचा ५५३ क्विंटल तांदूळ व १८ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे २८ लाख ४२ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  दरम्यान याबाबत नंदुरबार तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षद छगन नेरकर यांच्या फिर्यादीवरुन वाहनचालक दिलीप शिवाजी ढेंगे व नारायण चंद्रसिंग गाडे (दोन्ही रा.मोहजवाडी ता.बीड) व दुसऱ्या वाहनातील सुलेमान अजमखान (रा.नवापूरा, औरंगाबाद) या तिघा संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करत आहेत.