पहिला डोस घेतलेल्या ५५४९ तर दुसरा डोस घेतलेल्या ३३८१ जणांना कोरोनाची लागण

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या ५ हजार ५४९ तर दुसरा डोस घेतलेल्या ३ हजार ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी १३ जानेवारीपर्यंतच्या दिलेल्या माहितीनुसारची ही आकडेवारी आहे. दरम्यान, कालपर्यंत शहरातील ३१ लाख ४७ हजार ४६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

    पिंपरी – चिंचवड शहरात १ जानेवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. दिवसाची रुग्णसंख्या अडीच हजाराच्या पुढे गेली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. बाधितांपैकी तब्बल ८२ टक्के लोकांनी एकही डोस घेतली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, शहरातील ३१ लाख ४७ हजार ४६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. १७ लाख ८२३ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील ५ हजार ५४९ जणांना कोरोनाची लागण झाली. तर, १३ लाख ९८ हजार ३६ जणांनी डोस घेतला आहे. त्यापैकी ३ हजार ३८१ जणांनी कोरोनाची लागण झाली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होते. परंतु, प्रकृती गंभीर होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

    पिंपरी – चिंचवड शहरात महापालिकेची २७२ आणि खासगी १५६ अशी ४२८ लसीकरण केंद्रे आहेत. महापालिकेकडे कोविशिल्डचे १ लाख २५ हजार ७५० तर कोव्हॅक्सीनचे १८ हजार ९५० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही. त्यांनी तातडीने डोस घ्यावा. ज्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख झाली. त्यांनीही दुसरा डोस घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शहरातील १ हजार ८१५ दिव्यांग नागरिकांचे लसीकरण झाले. १९६ तृतीयपंथी, १ हजार २२९ गर्भवती महिलांनी लस घेतली. अंथारुणाला खिळून असलेल्या ४१४, परदेशात शिक्षणासाठी जाणार्या १ हजार ७२७ मुलांचे लसीकरण झाले. औद्योगिक क्षेत्रातील १ लाख ९० हजार २२८, इतर १३ लाख ९ हजार ३०३ आणि ६० वर्षावरील २ लाख ९५ हजार ६१ जणांनी लस घेतली आहे.