सिक्कीमच्या पुरात आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू, 4 दिवसांपासून 3 हजार पर्यटक अडकले, खराब हवामानामुळे हवाई बचावात अडथळा!

अचानक आलेल्या पुरामुळे सिक्कीममध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. सिक्कीममधील मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. 142 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये 30 मृतदेह सापडले आहेत. एकूणच पुरामुळे मृतांचा आकडा 56 वर पोहोचला आहे.

    सिक्कीममधील तीस्ता नदीला (Teesta River) अचानक आलेल्या पुराने (Sikkim flood) मोठा विध्वंस झाला आहे. चार दिवसांनंतरही माती आणि ढिगाऱ्यात मृतदेह सापडत आहेत. सिक्कीमच्या पुरात आतापर्यंत ५६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी पश्चिम बंगालमधील तिस्ता नदीच्या पात्रातून 30 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. लष्कराचे २२ जवान बेपत्ता झाले होते, त्यापैकी ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. राज्यात 3 हजार पर्यटक चार दिवसांपासून अडकून पडले आहेत. मात्र खराब हवामानामुळे हवाई बचाव कार्यात अडथळे येत आहेत. शुक्रवारी, हवाई दलाने MI-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने ऑपरेशन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
    आजतकच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील, सिलीगुडी, जलपाईगुडी आणि कूचबिहार या तीन जिल्ह्यांतील तिस्ता नदीच्या पात्रातून मृतदेह सापडले आहेत. सिक्कीम सरकारच्या म्हणण्यानुसार, मंगनमधील चार मृतदेह, गंगटोकमधील सहा आणि पाकयोंग जिल्ह्यातील भारतीय सैन्याच्या सात मृतदेहांसह 16 मृतदेह सापडले आहेत. सिक्कीम सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 142 लोक बेपत्ता आहेत आणि 25,000 हून अधिक लोकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.

    आतापर्यंत 2413 जणांची करण्यात आली सुटका

    बुधवारी पहाटे ढगफुटीमुळे सिक्कीमच्या तिस्ता नदीला अचानक पूर आला, ज्यामुळे 25,000 हून अधिक लोक आपत्तीमध्ये प्रभावित झाले आहेत. पुरामुळे 1,200 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. एकूण 13 पूल वाहून गेले आहेत. आतापर्यंत विविध भागातून 2,413 जणांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय राज्यभरातील 22 मदत छावण्यांमध्ये 6,875 लोकांनी आश्रय घेतला आहे. यातील बहुतांश क्षेत्रे देशाच्या इतर भागांपासून तुटलेली आहेत.

    चार दिवसांपासून अडकले तीन हजार पर्यटक

    वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या सुमारे 3,000 पर्यटकांना अद्याप बाहेर काढण्यात आलेले नाही. हवाई दलाकडून MI-17 हेलिकॉप्टर पाठवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु खराब हवामानामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. वास्तविक, सखल भागात ढगांचे आच्छादन आणि लाचेन आणि लाचुंग खोऱ्यांमध्ये कमी दृश्यमानता यामुळे ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे बागडोगरा आणि चाटेन येथून हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत. ते म्हणाले, हवामान चांगले राहिल्यास शनिवारी सकाळी हवाई बचाव कार्य पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

    मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

    मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि छावण्यांमध्ये राहणाऱ्यांना 2,000 रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची नेमकी माहिती आत्ताच देऊ शकत नाही. समिती स्थापन करून त्याचे विश्लेषण पूर्ण केल्यानंतर याची माहिती दिली जाईल. अडकलेल्या लोकांची सुटका करणे आणि त्यांना तात्काळ मदत देणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे.

    पुरामुळे जिल्ह्यांमधील संपर्क तुटला

    मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यांतील रस्ते संपर्क तुटला आहे. पूल वाहून गेले आहेत. उत्तर सिक्कीममध्ये दळणवळणावर वाईट परिणाम झाला आहे. बरडांग येथून बेपत्ता झालेल्या 22 पैकी 7 लष्करी जवानांचे मृतदेह तीस्ताच्या खालच्या भागात सापडले आहेत. तर एक जवान आधीच वाचला होता. मुख्यमंत्री म्हणाले, उर्वरित बेपत्ता सैनिकांचा सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात शोध सुरू आहे.