पालकांनो चिमुकल्यांवर लक्ष ठेवा, खेळता खेळता बाळाने मासा गिळल्याने ओढावला मृत्यू

अंबरनाथमध्ये घशात मासा अडकून 6 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

    ठाणे : घरात खेळता खेळता चिमुकले कित्येकदा कुठलीही वस्तू तोंडात टाकेल याच नेम नसतो. त्यामुळे लहान मुलांकडे सतत लक्ष द्याव लागतं. अनेकदा हा प्रकार त्यांच्या जिवावरही बेततो, असाच काहीचा प्रकार ठाण्यातील अंबरनाथमध्ये घडला आहे. खेळता खेळता मासा गिळल्याने तो मासा घशात अडकून 6 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. येथील सरफराज अन्सारी यांच 6 महिन्याचं बाळ शहबाज काल परिसरातील लहान मुलासोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक रडू लागला.याची माहिती परिसरातील मुलांनी त्याच्या पालकांना दिली. शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र,  शहबाजच रडणं काही थांबत नव्हत. त्यामुळे घरच्यांनी लगेच रुग्णालय  गाठलं. पण डॅाक्टरांनी त्याला तपासलं तरीही त्याच्या रडण्याचं कारण त्यांच्या लक्षात  येईना. त्यांतर शहबाजच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

    दरम्यान, डॉक्टरांनी शहबाज याला तपासलं, त्यावेळी त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं.  मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला.आता त्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर मोठा धक्का बसला असून पालकांनी चिमुकल्यांकडे सतत लक्ष देणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतय.