पिंपरी- चिंचवड शहरातील ६५ पोलीसांना कोरोनाची लागण

    पिंपरी : कारोनाचा रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना पिंपरी – चिंचवड पोलीस दलातील तब्बल ६५ पोलीसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनासह पोलीस दलावरही देण्यात आली आहे. त्या अंतर्गत कारवाई करणे, रात्रीच्यावेळी असलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी नाकाबंदी करणे, तसेच इतर कामासाठी अनेक नागरिक पोलीस ठाण्यात आल्याने त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. यातूनच पोलीसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

    पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण अवघे सात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बुधवार (दि.१२) पर्यंत तब्बल ६५ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित १७ अधिकारी आणि ४३ कर्मचारी गृहविलगीकरणात आहेत. आत्तापर्यंत पोलीस दलातील एकूण ११८ अधिकारी आणि ७४० कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून यातील पाच पोलीस कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या पोलीसांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच कोरोनाची लागण झालेल्या पोलीसांवर कसे उपचार होतात. त्यांना कोणत्या अडचणी येतात, हे सोडविण्यासाठी विशेष अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.