छत्रपती कारखान्याचे ७ लाख २९ हजार टनाचे गाळप; १४४ दिवस हंगाम चालला

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षाच्या गळीत हंगामाची सांगता यशस्वी झाली.

  बारामती: भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षाच्या गळीत हंगामाची सांगता यशस्वी झाली. या हंगामात ऊस गाळपाचे मोठे आव्हान असताना देखील तब्बल ७ लाख २९ हजार ५८१ टन उसाचे गाळप केले असून यावर्षी कारखान्याने सरासरी १०.७०% साखर उतारा गाठला. यावर्षीचा हंगाम तब्बल 1१४४ दिवस चालला. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

  काटे व पाटील म्हणाले, यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ लाख टन उसाची उपलब्ध होती. सुरुवातीच्या काळात आम्ही साधारणपणे १० लाख टनापर्यंत ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले होते. मात्र मागील वर्षीचा अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईचाही काहीसा परिणाम एकरी ऊस उत्पादनावर झाला.

  यावर्षी कोणत्याही अडचणींचा विचार न करता कारखान्याचे गाळप चांगल्या पद्धतीने होईल, याकडेच सुरुवातीपासून संचालक मंडळाने भर ठेवला आणि त्यानुसार गाळपाचा यशस्वीपणे प्रयत्न केला.दरम्यान प्रशांत काटे म्हणाले, यावर्षी कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपये पहिला हप्ता जाहीर केला होता. त्याला ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेनधारकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अन्य साखर कारखान्यांकडून उसाच्या पळवापळवीची स्पर्धा असताना देखील छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यावरच विश्वास ठेवला आणि त्यामुळे हे ऊस गाळप उद्दिष्ट गाठता आले.

  आतापर्यंत कारखान्याने सात लाख २९ हजार ५८१ टन उसाचे गाळप केले असून, एकूण साखर उत्पादन एवढ्या दोन दिवसात निश्चित होईल. दुसरीकडे सहवीजनिर्मिती प्रकल्प अजूनही सुरू असून, तो पुढील आठवड्यापर्यंत चालेल. आतापर्यंत सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २ कोटी ५३ लाख ५७ हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे.

  बँकेने साखरेचे मूल्यांकन मालतारणाच्या दृष्टीने शंभर रुपयांनी प्रतिक्विंटल कमी केल्याने ऊस उत्पादक सभासदांना व गेटकनधारकांना उसाचे पेमेंट वेळेत करण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाला खूप कसरत करावी लागली, मात्र छत्रपती कारखान्याने ऊस उत्पादक सदस्यांची हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जाहीर केला होता आणि त्याची अंमलबजावणी देखील केली असे काटे यांनी सांगितले.

  या हंगामामध्ये ऊस उत्पादक सभासद, गेटकनधारक यांच्याप्रमाणेच शेतकरी कृती समिती, शेतकरी संघटना, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, ऊस तोडणी व वाहतूक मजुर, वाहतूकदार, मुकादम व कारखान्याच्या कामगार, अधिकार्‍यांनी मनापासून केलेल्या सहकार्यामुळे हा हंगाम यशस्वीरित्या पार पडला अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केली.