७० टक्के लोकं महाराष्ट्रातलं ‘हे’ शहर सोडण्यास तयार, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

    चंद्रपूर (Chandrapur) : देशातील क्रमांक एकचे प्रदुषित शहर अशी चंद्रपूरची ओळख. चंद्रपूरातील प्रदुषणाने आता टोक गाठले आहे. चंद्रपुरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक नमुना सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून धक्कादायक निकाल हाती आला.

    पर्यावरण रक्षण संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत प्रश्नावली स्वरूपातील ऑनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे निकाल धक्कादायक आहेत. कोळसा-ऊर्जा निर्मिती- उद्योगबहुलता असलेल्या देशातील सर्वच शहरात प्रदूषण स्थिती गंभीर अवस्थेत पोचली आहे. चंद्रपुरात सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या ९४ टक्के लोकांनी वायू प्रदूषण घातक असल्याची माहिती दिली. ७५ टक्के लोकांनी वैयक्तिक आजाराची कारणे प्रदूषण असल्याचे नमूद केले. ६७ टक्के लोकांनी प्रदूषणामुळे त्वचा विकार असल्याची माहिती भरली. ५८ टक्के लोकांनी आपले श्वसनविकार प्रदूषणामुळे असल्याचे मान्य केले.

    डोळ्याच्या आजारांशी संबंधित विकार ५२ % लोकांनी मान्य केले. वर्षभरातील किमान १० दिवस पर्यावरणीय आजारामुळे आपण कामावर जाण्यापासून वंचित राहिल्याचे उत्तरदात्यांनी सांगितले. चंद्रपुरात सतत गोळ्या खाऊनच जगावे लागते असे मत ४० टक्के लोकांनी मांडले. चंद्रपुरातील ३६ टक्के नागरिक हिवाळ्यात आजारी होतात. घातक प्रदूषण आणि खालावलेले जीवनमान यामुळे चंद्रपुरात मालमत्तांची किंमत देखील मातीमोल होत चालल्याचे ६९ टक्के लोकांचे मत आहे.

    इतकंच नाहीतर जिल्ह्यातील पाणीही प्रदूषित झाले असून, हे घातक असल्याचे मत ८३ टक्के लोकांनी व्यक्त केले. व्यापक जनजागृती व प्रदूषणावर प्रशासकीय उपाययोजनांसाठी हे सर्वेक्षण केल्याची माहिती सर्वेक्षकांनी दिली. त्यामुळे लोकांवर आता हे शहर सोडण्याची वेळ आली आहे.