७० वर्षांच्या आजीने हत्याराविना दिली वाघाशी झुंज; शेवटी वाघ पळाला

गडचिरोलीतील एका वयोवृद्ध महिलेने वाघाशी झुंज देत वाघाला पळवून लावण्यात यश मिळवलं. ही घटना गडचिरोलीतील जोगना वनक्षेत्रातील मुरमुरी या गावात घडली. या घटनेनंतर परिसरात या महिलेच्या धाडसाची चर्चा आहे.

    गडचिरोली (Gadchiroli) : जवळ कमालीचे धाडस असेल, हिम्मत असेल, दांडगा आत्मविश्वास असेल तर जीवावर आलेलं संकट व्यक्ती उलथून टाकू शकतो, मग ती व्यक्ती ७० वर्षांची वयोवृद्ध का असेना… याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत गडचिरोतील ७० वर्षं वयाच्या आजी. या निधड्या छातीच्या आजीने हल्ला करणाऱ्या वाघाला पळवून लावलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जोगना वनक्षेत्रात येणाऱ्या मुरमुरी या गावात घडलेला हा थरारक प्रसंग ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या आजीचं नाव आहे सरिता चहाकाटे. इतेकच नव्हे, तर दुसऱ्या दिवशी या आजी पुन्हा आपल्या कामावर रुजू झाल्या. या वयोवृद्ध आजीने दाखविलेल्या धडासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    गडचिरोली जिल्ह्यातील कुनघाडा वनपरीक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या मुरमुरी शेतशिवारात २२ नोव्हेंबरला या आजी आपल्या शेतात काम करत होत्या. दरम्यान तहान लागल्याने त्या बांध्यावर गेल्या. त्या पाणी पीत नाहीत तोच समोर वाघ आला. वाघाला बघून आजीची भंबेरी उडाली. पण मृत्यू डोळ्यासमोर बघून आजीने न घाबरता त्या वाघाशी दोन हात करण्याचे ठरविले. तेवढ्यात वाघाने आजीवर पंजा मारण्याचा प्रयत्न केला. आजीने देखील त्याच आवेशात वाघावर हात उगारला.

    जवळपास १० मिनिटं ही झुंज चालली. मग काय, प्रतिहल्ला झाल्याचे बघून वाघाने तेथून धूम ठोकली. आजीने केलेला आरडाओरड ऐकून बाजूला शेतात काम करणारे मदतीला धावून आले. मात्र, तो पर्यंत वाघ पळून गेला होता. आजीने वाघाशी दिलेली झुंज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

    २२ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आजीला महिलेला कुठलीही इजा झालेली नाही. वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे आज या आजीचा जीव वाचला आहे.