वैराग नगरपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान; पहिल्याच निवडणुकीत उत्साह अन् चुरस

बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १३ जागांसाठी मंगळवारी ११,१०७ मतदारांपैकी ८,५५६ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात चार तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.

  बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १३ जागांसाठी मंगळवारी ११,१०७ मतदारांपैकी ८,५५६ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात चार तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. दिवसभराच्या मतदानात विक्रमी ७७.०४ टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी वीणा पवार यांनी दिली. नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळपासून चुरशीने मतदानास सुरूवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७७.०४ टक्के मतदान झाले.

  सकाळी साडेनऊपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. परंतु दहानंतर मतदानासाठी मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत होते. ५,५५६ पुरुष मतदारांपैकी ४,४७७ पुरुषांनी मतदान केले. तर ५,४५० महिला मतदारांपैकी ४,०७९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रभागनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे…

  प्रभाग : १) ७९.६५ टक्के,
  २) ८०.१८ ४) ७४, ५) ७२.४५ ६) ७६.४५ ७) ७२.६७, ८) ८२.०४, १२)७८.५६, १३) ७५.०७ १४) ७०.४५, १६) ७५.०६ आणि प्रभाग १७) ८०.४८ टक्के मतदान झाले आहे. मतदानावेळी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक केंद्रावर लसीकरणाची सोय केली होती. यात ४२० जणांना लस देण्यात आली.

  सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक ८ मध्ये ८२.०४ टक्के झाले. तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक १४ मध्ये ७०.४५ टक्के झाले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर तर भाजपचे दत्तात्रय क्षीरसागर यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादीच्या गुरुबाई झाडबुके, काँग्रेसच्या तेजस्विनी मरोड, तर भाजपच्या रेश्मा शिंदे यांच्यात लढत होत आहे. तर सुप्रिया निंबाळकर या प्रभाग ८ मधून, दिलीप गांधी १२ मधून तर शाहूराजे निंबाळकर हे प्रभाग क्रमांक १७ मधून नशीब आजमावत आहेत.

  पोलीस प्रशासनाने ६ अधिकारी, ४८ हवालदार ,१ विशेष राखीव पोलीस दल आणि ४५ होमगार्ड असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी वीणा पवार काम करीत आहेत.