विधानपरिषदेच्या आठ सदस्यांना निरोप

    मुंबई : विधान परिषदेचे आठ सदस्य या सत्राअखेर निवृत्त होत आहेत. सदनाच्या परंपरेनुसार आज त्यांना निरोप देण्यात आला. त्याकरीता विधान परिषदेत निरोपाची भाषणे झाली. त्यानंतर सदस्यांचा एकत्रित फोटो घेण्याची प्रथा आहे. मात्र, शिवसेना सदस्य रामदास कदम यांनी या फोटोच्या वेळी अनुपस्थिती दर्शवली.

    यावेळी कॉंग्रेस सदस्य भाई जगताप देखील अनुपस्थित राहिले. योगायोग असा की हे दोन्ही सदस्य खेड दापोली तालुक्यातील आहेत.

    निवृत्त होणाऱ्या सदस्यामध्ये शिवसेनेचे गोपीचद बाजोरिया, रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, सतेज बंटी पाटील, भाजपचे गिरीश व्यास, प्रशांत परिचारक, अरुण जगताप  व अम्बरीश पटेल यांचा समावेश आहे. यापैकी बंटी पाटील, अमरिश पटेल पुन्हा निवडून आले आहेत.

    निरोप समारंभात भाषण करताना रामदास कदम यांनी जीवनभर शिवसेना पक्षाशी निष्ठा राखली. आता निवृत्ती घेत असल्याचे दोन वर्षापूर्वीच जाहीर केल्याचे सांगितले. मात्र, ५४ वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर आपल्या मुलांना शिवेसेनेत काम करताना संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    ते म्हणाले की, मी जीवनभर भगवा झेंडा सोडणार नसून शिवसेनेतच मरणार आहे. बाळासाहेंबाच्या आत्म्याला दु:ख होईल, असे कोणतेही वर्तन आपल्याकडून होणार नाही असे त्यांनी भावनिक होत सांगितले. मात्र, कार्यक्रमानंतर एकत्रित फोटोच्या कार्यक्रमात ते  उपस्थित राहिले नाहीत. कारण संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यासोबत फोटो काढून घेणे त्यांना योग्य वाटले नसल्याचे सांगण्यात आले.