कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

तापोळा पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आलेल्या रामदास भिकन डावले (वय २९, रा. बोंडारवाडी (धनगरवाडी) ता. महाबळेश्वर) या युवकाचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

    महाबळेश्वर : तापोळा पर्यटनस्थळी (Tapola Tourist Spot) फिरण्यासाठी आलेल्या रामदास भिकन डावले (वय २९, रा. बोंडारवाडी (धनगरवाडी) ता. महाबळेश्वर) या युवकाचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी सायंकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नातेवाईकांना यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला असून, मृतदेह सातारा येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामदास भिकन डावले हा युवक मेटगुताड येथील हॉटेल पिकाडेलमध्ये कामास होता. याच हॉटेलमध्ये कामाला असलेले रामदास याचे मित्र शशिकांत काशिनाथ ओंबळे (सध्या रा. भिलार, शुभम तांडेकर रा. पुणे) व सागर भैय्यालाल कोल (रा. मध्यप्रदेश) हे चौघेजण मंगळवार (दि.१४) रोजी सायंकाळी फिरण्यासाठी त्यांच्या गाडीने अहीर वानवली येथील शिवसागर जलाशय परिसरात पर्यटनासाठी आले होते. यामधील रामदास भिकन डावले या युवकाचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पडून अंत झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून, बुधवारी दुपारी महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील भाटिया, अनिल केळगने, सनी बावळेकर, सूर्यकांत शिंदे, सुरेश डोईफोडे, अभय डोईफोडे, तुकाराम शिंदे, शंकर ढेबे आदींसह स्थानिकांच्या मदतीने बुधवारी सायंकाळी मृतदेह जलाशयाबाहेर बाहेर काढण्यात यश आले.

    या युवकाचा मृतदेह सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या युवकाचे नातेवाईकांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत असून या घटनेचा सखोल तपास पोलिस प्रशासनाने करावा, अशी मागणी करीत आहेत. याबाबतची माहिती शांताराम रामचंद्र डावले यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

    महाबळेश्वरनजीक मेटगुताड येथील पिकाडेल हॉटेलमध्ये मृत रामदास डावले हा युवक गेल्या चार वर्षांपासून कामास होता. त्याला दोन लहान मुले असून, आर्थिक परिस्थिती बेताची आहे.