वयाच्या ९५ व्या वर्षी महिलेवर बायपास शस्त्रक्रिया; कृष्णा रुग्णालयाचे कार्य

कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेवर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया (Bypass Surgery) यशस्वीपणे करण्यात आली. एवढ्या वयस्कर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

    कराड : कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेवर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया (Bypass Surgery) यशस्वीपणे करण्यात आली. एवढ्या वयस्कर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

    माण तालुक्यातील जाशी येथील रहिवासी असलेली ९५ वर्षीय वृद्ध महिला छातीत दुखू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. याठिकाणी त्यांच्यावर डॉ. विजयसिंह पाटील यांनी ॲन्जिओग्राफी केली असता, त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरंतर एवढ्या वयस्कर महिलेवर बायपास शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. पण कृष्णा हॉस्पिटलमधील हृदय शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. प्रवीण साळुंखे यांनी हे आव्हान स्विकारून या महिलेवर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया केली. तसेच ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. या महिलेची प्रकृती आता ठीक असल्याने तिला नुकताच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

    शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ. प्रवीण साळुंखे, भूलतज्ज्ञ डॉ. सम्राट मदनाईक, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत शेळके, डॉ. विजयसिंह पाटील यांचे कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले.

    ८५ हून अधिक हृदय शस्त्रक्रिया

    कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय व रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने व अत्याधुनिक उपचार प्रणालीचा वापर करत यापूर्वीही अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. विशेषत: कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळात यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश शस्त्रक्रिया मोफत केल्याने त्याचा रूग्णांना मोठा लाभ झाला आहे.