जांभूळवाडीतला बंगला फोडला तर बाणेरला फ्लॅट फोडला ; दोन घरफोड्यांमध्ये तब्बल २८ लाखांचा ऐवज चोरला

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

  पुणे :  शहरात घरफोड्यांची धगधग कायम असून, चोरट्यांनी जांभूळवाडीतील बंगला फोडून तब्बल २१ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, बाणेरमधील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून ७ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या व्यतिरीक्त लोणी काळभोर व हडपसरमध्ये देखील घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी चार घटनांमध्ये ३० लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, दोन घरफोड्यांत २८ लाख २८ हजारांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. दरम्यान, शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद घातला आहे.

  -दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा
  याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्रभाकर जांभळे (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी पहाटे पावणे दोन ते सव्वा पाच या वेळेत घडला आहे.

  तक्रारदार शेतकरी आहेत. ते मुळचे जांभुळवाडी येथील असून, त्यांचा कोळेवाडी रोडवर अर्जुन निवास नावाचा बंगला आहे. शनिवारी बाहेर गावी गेले होते. यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातून ४ लाख २८ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा २१ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरून नेला. बंगल्याला सीसीटीव्ही आहेत. त्यात एका ठिकाणी चोरटे कैद झाले आहेत. परंतु, त्यांनी जॅकेट व चेहऱ्याला मास्क लावल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, काही ठिकाणचे सीसीटीव्ही त्यांनी फिरवले आहेत.

  अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दुसऱ्या घटनेत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात संदिप खाटपे (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे बाणेर येथील एका बहुमजली इमारतीत राहतात. श्रीनाथ नगर येथील लेन नंबर दोन येथील आयरिस अपार्टमेंट येथे त्यांचा फ्लॅट आहे.

  दरम्यान, ते दोन दिवसांपुर्वी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराचा कडी-कोंयडा उचकटून आत प्रवेश केला व घरातील दागिने व रोकड असा ७ लाखांचा ऐवज चोरून नेला. तसेच, चोरट्यांनी हडपसर-सासवड रोडवरील साडीचे दुकान फोडून चोरट्यांनी ३७ हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी तुकाराम शेरकर (वय ४८) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर, मांजरीत घराला बाहेरून असणारे शटर तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. याबाबत ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.