दुचाकी प्रवासी वाहतूक; रॅपीडोच्या जगदीश पाटील यांच्यावर गुन्हा नोंद

- रिक्षा संघटनेच्या बंदच्या भूमिकेनंतर आरोटीओकडून तक्रार दाखल

  पुणे : पुण्यासह राज्यभरात सुरू असलेल्या ‘रॅपीडो’ या दुचाकी प्रवासीप्रकरणात अखेर आरटीओने कारवाई केली असून, कंपनीच्या जगदीश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकारवाईने चांगलीच खळब‌ळ उडाली असून, दुचाकीमधून प्रवासी वाहतूक ही नवीन कल्पना पुणेकरांना चांगलीच भावली होती. परंतु, शासकीय तसेच आरटीओची परवानगी नसल्याने आता यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दुचाकी प्रवासी वाहतूकविरोधात रिक्षा संघटनेने बंदची हाक दिली होती. २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात रिक्षा चालकांनी बंद पुकारला होता. त्यानंतर आरटीओला जाग आल्याचे बोलले जात आहे.

  याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जगदीश पाटील व इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आरटीओचे अधिकारी अनंत भोसले (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार, भादवी ४१८, मोटार वाहन कायदा कलम ६६ , ९३, १९२ (अ), १४६, १९३, १९७ व आय टी ऍक्ट ६६ (डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  भांडारकर रोडवर या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. जगदीश पाटील हे या कंपनीचे प्रमुख आहेत. दरम्यान, रॅपिडो (The Roppen Transportation Services Pvt. Ltd.) या कंपनीला महाराष्ट्र राज्याचा अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा कोणताही परवाना नाही. तरीही कंपनीने ‘बाईक टॅक्सी’ सेवा सुरू केली. पुण्यासह राज्यभरात विनापरवानगी आणि बेकायदेशीर ऑनलाईन ॲप सुरू करून ही सर्विस सुरू करण्यात आली आहे.ऑनलाइन ॲपवरून प्रवाशांची बुकिंग करून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केली जात होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  -बेकायदेशीर सर्विस देणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात गुन्हा
  दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर बाईक टॅक्स विरोधात रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबर रोजी बंदची हाक दिली होती. बघतोय रिक्षावाला संघटनेने हा बंद पुकारला होता. त्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला होता. मात्र आंदोलन होण्यापूर्वीच बेकायदेशीर सर्विस देणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

  दरम्यान, पुण्यासह राज्यात दुचाकी प्रवासी ही नवीन प्रवासी कल्पना कमी कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. दुचाकीवर प्रवाशांनी हव्या त्या ठिकाणी अगदी कमी पैशामध्ये सोडले जाते. तर वस्तूही पोहचवल्या जातात. दुचाकी प्रवास कमी पैश्यात व कमी वेळात जलद होत असल्याने त्याला प्रचंड मागणी आहे. मात्र ही प्रवासी वाहतूक बेकायदा आहे. त्याला शासन व आरटीओची परवानगी नाही. तसेच, रिक्षा प्रवासी व इतर प्रवासी वर्गाकडून याला तीव्र विरोध होत आहे.