विक्रोळी मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

या भाडेकरारानुसार गणेश चुक्कला यांना हा फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र, त्यांनी यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. यावेळी आपल्यात 3 नव्हे 30 वर्षांचा करार झल्याचा दावा चुक्कल यांनी केला.

    मुंबई : विक्रोळी येथील मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्या विरोधात पवई येथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्या बहिणीची कंपनीच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका फ्लॅटच्या करारा संदर्भात हा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हण्टलं आहे.

    गणेश चुक्कल हे मनसेचे विक्रोळीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पवई हिरानंदानी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. हा फ्लॅट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची बहीण अलकाच्या कंपनीशी संबधित आहे. दरम्यान, हा फ्लॅट तीन वर्षांच्या भाडे करारावर गणेश चुक्कल यांना देण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे गणेश चुक्कला यांना हा फ्लॅट रिकामा करण्यास सांगण्यात आलं मात्र, चुक्कल यांनी फ्लॅट खाली करण्यास नकार दिला त्यामुळे हे प्रकरण न्यायलयात गेलं. यावेळी आपल्यात 3 नव्हे 30 वर्षांचा करार झल्याचा दावा चुक्कल यांनी केला. मात्र, अलका यांच्या वकिलाने असा कोणताही करार झाल्याचे फेटाळून लावला आहे. तसेच, गणेश चुक्कल यांनी या संदर्भातील काही कागदपत्रे न्यायलयात सादर केली. मात्र, या कागदपत्रावरील आणि करारावरील सह्या खोट्या असल्याचे अलका यांच्या वकिलाने आरोप केला आहे.