पाच मजली अपार्टमेंट पत्त्याप्रमाणे कोसळलं; ढिगाऱ्याखाली दबलेत अनेक जण, 14 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश!

मिळालेल्या माहितीनुसार, भूमिगत खोलीही बांधली जात होती. यावेळी इमारतीच्या फाउंडेशन ग्रीडला तडे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    लखनऊ  : लखऊमध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास एका भयानक दुर्घटनेत एक पाच मजली (Buliding Collaps) इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली. या घटनेत ढिगाऱ्याखाली तीसहून अधिक लोक दबले गेले. पोलीस, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी बचावकार्य केले असून आतापर्यंत १४ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

    बचावकार्य सुरू

    लखनौचे डीएम सूर्यपाल गंगवार यांनी सांगितले की, निवासी इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. आत अडकलेल्या लोकांना ऑक्सिजन दिला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, नगरविकास मंत्री एके शर्मा यांच्यासह प्रशासनातील सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीजीपी डीएस चौहान यांनी सांगितले की, आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल.

    पाच मजली अलाया अपार्टमेंटमध्ये एकूण 12 फ्लॅट आहेत. काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास अचानक इमारत कोसळली. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांव्यतिरिक्त एसडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी पोहोचले.

    एनडीआरएफची टीमही रात्री उशिरा पोहोचली. तीन-चार जेसीबी लावून ढिगारा हटवून हँड ड्रिलिंग मशिनच्या सहाय्याने ढिगारा कापून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पथकांनी एक एक करून १२ जणांना बाहेर काढले. ढिगारा इतका आहे की तो काढण्यासाठी बराच वेळ लागेल. डीजीपी डीएस चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी आठ ते दहा कुटुंबे उपस्थित होते.