रीलच्या वेडापायी तरुणीला बसला 17 हजारांचा फटका, भररस्त्यात रिल बनवणारीला वाहतूक पोलिसांनी घडवली अद्दल!

मुलीच्या या रिलच्या व्हिडिओची दखल घेत साहिबााबाद कोतवाली पोलिसांनी कार क्रमांकाच्या आधारे तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    गाझियाबाद :  इन्स्टाग्रामने (Instagram) सध्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेड लावलयं. त्यात इन्स्टाग्रामवर रिल (Instagram Reel) बनवायला आजकाल सगळ्यांना आवडतं. आपण रोज असे अनेक व्हायरल (Viral Video)  झालेले डान्सचे व्हिडिओ बघतो. पण काहीजण जीव धोक्यात घालून सार्वजनिक ठिकाणी रिल बनवताना दिसतात. असंच इन्स्टाग्रामचं वेड असणाऱ्या तरुणीने एलिव्हेटेड रोडवर कार पार्क करून रील केली. त्याचा व्हिडिओ रविवारी इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र हे रिल बनवणं तिला चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी तिला १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    रविवारी या तरुणीचा व्हिडिओ  इंटरनेटवर  व्हायरल झाला. 16 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार एलिव्हेटेड रोडवर उभी असल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोर एक तरुणी उभी राहून व्हिडिओ बनवत आहे. रस्त्यावरील वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे अपघाताचा धोका  आहे. पण या तरुणीला त्याची काही पर्वा असल्याच दिसत नाही. दरम्यान, या व्हिडिओची दखल घेत साहिबााबाद कोतवाली पोलिसांनी कार क्रमांकाच्या आधारे तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एव्हडेच नव्हे तर, वाहतूक पोलिसांनी तिला १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला.